शेवटची सुरुवात – भांडवली व हिंदुत्ववादी शक्तींच्या सोनेरी स्वप्नांना तडा
मोदी हे देशातील भांडवली व हिंदुत्ववादी शक्तींना पडलेलं सोनेरी स्वप्न होतं. गेली दहा वर्ष या शक्तींनी स्वप्नपूर्तीचा आनंदसोहळा पुरेपूर उपभोगला. १९९९ ला पूर्ण मुदतीचे सरकार भाजपने चालवले तरी हिंदुत्ववादी व भांडली शक्तींना एवढा खुलेआम अवकाश कधीच मिळाला नव्हता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कालखंडात त्यांनी तो उपभोगला. यास अजून पाच वर्षाची मुदतवाढ मिळणे हे केवळ औपचारिकता वाटत असताना मात्र आक्रितच घडले. लोकसभा निकालांनी त्यांच्या आनंदावर विरजण घातलें. हे स्वप्न भंग पावले नसले तरी काळवंडले मात्र नक्कीच आहे. हा एका ऐतिहासिक टप्पा आहे. त्यामुळे याचे विश्लेषण करणें व नव्या संदर्भातील आव्हानांचा विचार करणें अपरिहार्य ठरते.