१ मे : दुष्काळग्रस्तांसाठी कामगारांचा लढा

कामगार भगिनी व बंधूंनो,

आज १ मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिन. सन १८८६ साली शिकागो शहराच्या ’हे मार्केट’ चौकात कामगारांची जी कत्तल झाली तिच्या स्मरणार्थ हा दिवस कामगार दिन म्हणुन साजरा केला जातो. अर्थात हा दिवस एकुणच कामगार वर्गाने आपल्या न्याय हक्कांसाठी झुंजारपणे जगभर दिलेले लढे व त्यासाठी प्रसंगी दिलेले बलिदान याचे प्रतिक बनला आहे. सर्वप्रथम या सहासी कामगार बांधवांना ’लाल अभिवादन’ करुया. कारण कष्टकऱ्यांच्या या संघर्षातूनच लाल बावट्याचा जन्म झाला व तो आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचा प्रतिक बनला आहे.

कारखान्यातील कामगाराचे शोषण करणारा भांडवलदार वर्ग व त्याच्या हातचे बाहुले बनलेले सरकार समाजातील इतर कष्टकरी, विद्यार्थी व शेतकरी यांनाही न्याय देऊ शकत नाही हे दुष्काळाच्या प्रश्नाने सिद्ध केले आहे. महासत्तेचा लबाड प्रचार करणारे हे शासन मात्र राज्यातील जनतेला पिण्याचे पाणी देण्यासही अपात्र आहे. विकासाच्या नावाखाली गेल्या २० वर्षात उभी केलेली, सामान्य कष्टकऱ्यांना न परवडणारी टोलेजंग बांधकाम व यासाठी केलेला नदीतील वाळूचा अनिर्बंध उपसा, खाणकामासाठी केलेली अपरिमीत जंगलतोड व शेतीची लावलेली वाट यामुळे पाण्याच्या संवर्धनास मदत करणाऱ्या नैसर्गिक घटकांची जबरदस्त हानी झाली आहे.

सिंचनाच्या कामात राजकारणी, कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने अक्षरश: अब्जावधी रुपयांचा निधी निव्वळ वाया गेला आहे. ग्रामीण भागात जातीय आधारावर वडिलोपार्जित मिळालेली शेकडो एकर जमीन व त्यामुळे गलेलठ्ठ झालेले बडे शेतमालक आपल्या पैशाच्या जोरावर अनेक विहिरी, बोअरवेल व प्रसंगी नदीवर मोटार बसवुन ऊसासाठी पाण्याचा बेसुमार उपसा करत आहेत. केवळ ६% क्षेत्रावर लावलेला ऊस सिंचनाच्या एकुण पाण्यापैकी तब्बल ६०% पाणी वापरतो. यामुळे गावातील विहिरी कोरड्या पडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

त्याचवेळेस सामान्य जनतेला प्यायला पाणी नसतानाही मौजमजेसाठी वॉटर पार्कपासुन ते दारु, कोक, पेप्सी बनविण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. ठाण्यातील वाडा येथे कोकाकोलाचा कारखाना भूगर्भातून रोज १० लाख लिटर पाण्याचा उपसा करतो. मराठवाड्यात करोडो लोकांना प्यायला पाणी नसताना औरंगाबाद येथिल बियर उद्योग रोज तब्बल ३.५ कोटी लिटर पाणी वापरतात. अशा प्रकारे हा निसर्गनिर्मित दुष्काळ नसुन सामान्य शेतकरी, कष्टकरी व एकुणच जनता यांच्या हिताविरुद्ध काम करणाऱ्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेतून निर्माण झालेले संकट आहे. आज कामगार दिनानिमित्त आम्ही कामगार आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी व तमाम कष्टकरी भगिनी, बांधवांना शासननिर्मित दुष्काळाच्या या लढ्यात पाठिंबा देत खालिल मागण्या करत आहोत.

1) पाणी ही नैसर्गिक संपत्ती असुन त्यावर समाजाचा हक्क आहे. पेप्सी, कोका कोला, बियर-दारु यांसारख्या पेयांसाठी सार्वजनिक पाण्याची लूट करुन त्यावर नफेखोरी करणाऱ्या सॉफ्ट ड्रिंक्स, दारु यांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालावी.
2) सहकारी साखर कारखान्यांवरील साखर सम्राटांची मक्तेदारी नष्ट करुन सामान्य शेतकरी, कारखान्यातील कामगार, ऊसतोडणी मजूर यांच्या लोकशाहीत्मक नियंत्रणाखाली त्यांची पुनर्रचना करावी. खाजगी साखर कारखाने ताब्यात घेऊन त्यांचीही याचप्रमाणे पुनर्रचना करावी.
3) भूगर्भातील तसेच भूपृष्ठावरील पाण्याचा उपसा करणाऱ्या नव्या खाजगी विहिरी, बोअरवेल यांवर बंदी घालत अस्तित्वातील विहिरी, बोअरवेल यांचे सार्वत्रिकीकरण करावे. गावातील पाण्याचा वापर व समन्यायी वाटप शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या पाणी पंचायतीमार्फत लोकशाही पद्धतीनेच करावे. यात गावातील सर्व जातींना प्रतिनिधित्व देण्याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.

============================== संपर्क =================================
कॉ. सुभाष सरीन – ९८२२२४३१५८, कॉ. ऋषीकेश दिवेकर – ७७०९१६६९१५
लोकचेतना मंच पिंपरी,  चिंचवड कर्मचारी महासंघ, नव समाजवादी पर्याय