पहिला अंक हाती देताना…

ढोंगही करता येऊ शकते व आवही आणता येतो. जगाच्या इतिहासात प्रथमच जगण्याचा कोणताही आधार न गवसल्याने २.५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे एक भयानक सत्र आपल्या डोळ्यांदेखत या देशात सुरु आहे. आफ्रिकेपेक्षाही अधिक बालके दरवर्षी या देशात कुपोषणाने बळी पडत आहेत. पण या साऱ्याकडे दुर्लक्ष करत जणू हे सारे घडतच नाही असे मानून आपण सगळ्यांनी देश महासत्ता होत असल्याचे ढोंग करत रहायचे. शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ऊसळी  मारली म्हणजे देशाची प्रगती झाली मानायचे, रोज नवेनवे मॉल्स, मॅकडोनाल्डस, केएफसी उभे राहत आहे हा विकास समजायचा आणि अंबानी-अदानी यांची संपत्ती अब्जावधींनी वाढतेय व जगातील गर्भश्रीमंतांच्या यादीत अधि काधिक भारतीयांची नावे चमकत आहेत यातच आपला देशाभिमान बाळगायचा!

मेंदू बधीर करुन समोर स्पष्ट दिसणारे वास्तव नाकारत किती काळ हे ढोंग चालू ठेवणार आहोत? हे असेच चालू ठेवणे हे नक्कीच समाजातील सत्ताधारी वर्गाच्या हिताचे आहे. आपल्या मात्र नक्कीच नाही! आपल्या जगण्याचे वास्तवच वेगळे आहे आणि त्याच्याशी प्रतारणा करत खोट्या भ्रमात गुंगून भाबडेपणाने या व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याची चैन आपल्याला परवडणारी नाही. नीट पाहिले तर आजुबाजूला अनेक हसऱ्या मुखवट्यांखाली भाकरीच्या विवंचनेने सुरुकुतलेले व काळवंडलेले चेहरे आणि रोजच मरत मरत जगणारे अनेक मानवसदृश्य जीव नजरेस पडतील.

नक्कीच, प्रस्थापित व्यवस्था व समाजरचना या देशातील बहुसंख्य जनतेच्या हिताची नाही; नाही ती या दॆशातील करोडो तरुणांच्या ऊर्जेला, आकांक्षांना व स्वप्नांना न्याय देणारी आहे. आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती समाजाला एका नव्या उंचीवर नेण्याची क्षमता बाळगते. पण याचवेळेस हे सारे नाकारुन समाजाला भुतकाळातच गाडून आपली सत्ता अबाधित ठेवण्यास प्रस्थापित वर्गही सरसावला आहे. आधुनिक काळ आजच्या युवतींना स्वातंत्र्याचे, समानतेचे नवे भान देत आहे, प्रस्थापित पितृसत्ताक बंधनांची जोखडं झुगारण्याची प्रेरणा देत आहे. पण त्याचवेळेस धर्म, रुढी, परंपरा यांच्या नावाखाली ही नवी जाणीव खुडायला तथाकथित संस्कृतीरक्षक सरसावले आहेत. जातीव्यवस्थेचा अंत करुन बंधुत्वावर आधारित एक नवा सशक्त समाज घडविण्याऎवजी जातीय शोषण नवे रुप धारण करत आहे. धर्म, संस्कृती यांच्या नावाखाली समाजाला बधीर करण्याचा जोरदार कार्यक्रम धर्ममार्तंडांनी चालविलेला आहे. आजचे सत्ताधारी एकीकडे आमच्या (म्हणजे त्यांच्या) पुराणांत विमानाचाही शोध लागला होता असा भंपक, बालिश प्रचार करत आहेत तर त्याचवेळेस मात्र भारतीय रेल्वे विकायला काढून त्यासाठी अमेरिकेपासून, चीन, जपानच्या गुंतवणूकदारांच्या दाढ्या खाजवत, त्यांच्यामागे शेपूट हालवत दाव्होसपासून, बीजिंग, टोकियोला हिंडत आहेत. त्यांच्या पुराणातील काल्पनिक महानतेचे ऊर बडवत आजचे आपले विषम समाज वास्तव नाकारणे हा केवळ आपण आपला स्वत:चाच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांचाही द्रोह करणारे ठरेल.

अर्थात सत्ताधाऱ्यांनी कितीही भ्रमात राहायचे ठरविले तरी आजचा तरुण, तरुणी व एकुणच कष्टकरी जनता या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करत आपापल्या परिने त्याच्याशी लढतेय. या प्रश्नांची उत्तरे अर्थातच ब्रेकिंग न्यूजवाली प्रसारमाध्यमे देऊ शकणार नाहीत; नाही ते त्यांच्या लढ्याचे चित्रण करणार आहेत. त्यासाठी आपल्यालाच आपली प्रसारमाध्यमे उभारावी लागणार आहेत. त्याच दिशेने टाकलेले हे एक पाऊल. याद्वारे  अवतीभोवतीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडींचे सत्यरुप समजून घेऊन प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा उभारला पाहिजे.

आम तौर पर लोग चिजे जैसी हें उसके आदी हो जाते है

और बदलाव के विचार से ही कांपने लगते है ।

हमें इसी निष्क्रियता की भावना को

क्रांतीकारी भावनासे बदलना है ।

– शहिद भगतसिंग

हाच आहे आपल्या मासिक वृत्तपत्राचा उद्देश!