मनुष्य स्वार्थी आहे का ?

मनुष्य स्वार्थी आहे का ?

आपण नेहमी ऎकतो माणूस हा स्वार्थी प्राणी आहे, ‘स्वार्थ’ ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. हे पटवून देताना डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा आधार घेऊन सांगितले जाते की ‘ only fittest can be survive. ’ जगण्यासाठी स्वतःचा स्वार्थ पाहणे आवश्यक तर आहेच पण त्यात काही चुकीचेही नाही तर ते नैसर्गिकच आहे. पण हे खर आहे का? माणूस निसर्गतःच स्वार्थी प्राणी आहे का? स्वार्थ हा त्याचा उपजत गुण आहे का? याचा उलगडा करण्यासाठी मनुष्याच्या आदिम कालखंडापासून ते आजतागायतच्या वाटचालीकडे एक नजर टाकूया.
आदिम कालखंडात मनुष्य टोळ्यांमध्ये राहून भटकंतीचे जीवन जगत होता. यानंतर पुढे एका टप्प्यावर शेतीचा शोध लागला. शेतीच्या शोधामुळे जीवन स्थिर झाले, अन्नाची शाश्वतीही मिळाली. इतकेच नव्हे तर अतिरिक्त उत्पन्नही होऊ लागले आणि त्यातून खाजगी संपत्तीचा उदय झाला. समाजातील एका वर्गाने या अतिरिक्त उत्पादनावर आपला हक्क गाजवत समाजातील इतर घटकांवर आपले वर्चस्व व सत्ता प्रस्थापित केली. यातूनच विषमतापूर्ण समाजाची निर्मिती झाली. शेतीच्या शोधानंतर जगभरात निर्माण झालेल्या प्राचीन संस्कृतींमध्ये अशा विषमतेचे दर्शन घडते. रोमन साम्राज्यात हे थेट गुलामगिरीचे स्वरुपात होते तर भारतात वर्णव्यवस्थेच्या स्वरुपात.
अर्थात एका मुठभर वर्गाला बहुजनांवर अशाप्रकारे सत्ता टिकविणे हे सोपे नसते. त्यासाठी तो शस्त्रांद्वारे त्यांचे दमन करतोच. मात्र केवळ तेवढे पुरेसे नसते. कारण शोषित वर्गाकडून विरोध, बंड होण्याचा धोका असतो. इतिहासात अशा अनेक बंडांची उदाहरणे सापडतात. हे टाळण्यासाठी सत्ताधारी वर्ग अजून एका हत्याराचा वापर करतो. ते म्हणजे वैचारिक प्रभुत्व. हा वर्ग आपल्या सत्तेस पुरक व तीला मान्यता देणाऱ्या विचारसरणीचा, संस्कृतीचा पुरस्कार करतो, ही विचारसरणी समाजातील बहुसंख्यांकांवर एका छोट्या वर्गाच्या असणाऱ्या वर्चस्वाचे व सत्तेचे केवळ समर्थनच नाही तर त्याचे उदात्तीकरणही करते. याचा जोरदार पुरस्कार करुन ती बहुसंख्यकांवर लादली जाते. यातून हा शोषित वर्गही आपल्या गुलामीला नैसर्गिकच मानतो व तीचा स्वीकार करतो. (हा ’सांस्कृतिक प्रभुत्वाचा’ सिद्धांत इटालियन मार्क्सवादी क्रांतीकारक अंतोनिओ ग्रामश्चीने मांडला.)
याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऋग्वेदातील पुरुषसूक्त. या सुक्तानुसार ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण, बाहुतून क्षत्रिय, मांडीतून वैश्य आणि पायातून शूद्रांची निर्मिती झाली आहे. हे सुक्त ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान व शुद्रांचे कनिष्ठ स्थान या विषमतेचे केवळ समर्थनच करत नाही तर ती प्रत्यक्ष ब्रह्मानेच निर्माण केल्याचे सांगुन तिला दैवी आधारही देतो. स्पष्टच आहे, एकदा का हे वेद वा सुक्त स्विकारले की मग ब्राह्मणांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते प्रत्यक्ष देवानेच निर्मिले आहे. ब्राह्मणी संस्कृतीतील कर्म सिद्धांतही अशाच प्रकारे जातीव्यवस्थेचे समर्थन करतो. या जन्मी तुम्ही कोण आहात हे पूर्वजन्मातील कर्मानुसार ठरते. जर तुम्ही दलित म्ह्णून जन्मला असाल तर त्याचे कारण तुम्ही मागील जन्मी केलेले पाप आहे व यातून मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही या जन्मीचे कर्म म्हणजेच उच्चवर्णीयांची सेवा प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यकच आहे. यावरून लक्षात येते की सत्ताधारी वर्ग आपली सत्ता टिकविण्यासाठी नेहमीच वैचारिक प्रभुत्वाचा हत्यार म्हणून वापर करतो.
सध्याच्या ज्या विषमतापूर्ण समाजात आपण राहतो ती आहे ‘भांडवलशाही’. या भांडवली व्यवस्थेत भांडवलदार वर्ग पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती, कामगारवर्ग, सर्वसामान्य ग्राहक यांचं शोषण करून रग्गड नफा कमावत असतो. यात मुठभर भांडवलदार वर्गाकडे संपत्तीचे प्रचंड केंद्रीकरण होऊन बहुसंख्य जनता हालाखीच्या अवस्थेत जगत आहे. ही विषमता एवढी भयानक आहे की जगातल्या तब्बल ३५० कोटी जनतेच्याकडे जेवढी मालमत्ता आहे तेवढी केवळ जगातील ८० धनाढ्यांकडे एकवटली आहे. जगातील केवळ १% धनाड्यांकडे एकुण संपत्तीचा निर्णायक वाटा एकवटला आहे. ही एवढी संपत्ती यांनी कशी गोळा केली? जगातील ६०० कोटी लोकांकडे नाही एवढी महान बुद्धिमता या केवळ १% लोकांकडे आहे? की ६०० कोटी जनता अळशी व सुस्त बसून असते व केवळ हे १% लोकच मेहनत, कष्ट करुन एवढी संपत्ती जमवितात? गोष्टी स्पष्ट आहेत. अमेरिका, युरोप, जपान येथील भांडवलदारांनी आशिया, अफ्रिका, लॅटीन अमेरिकेतील देशांना वसाहती बनवून तर भारतासारख्या देशातील अंबानी-अदानी सारख्यांनी येथील जनतेला लुटून राजकारण्यांशी संगनमत करुन एवढी संपत्ती बळकावली आहे. या वर्गाच्याकडे असणारी सत्ता, संपत्ती ही उघड्या नागड्या स्वार्थावर आधारीत आहे. जसे औषध कंपन्यांचे नफे हे औषधे आधिकाधिक महाग व आधिक प्रमाणात विकण्यावर आधारीत आहेत. मग आवश्यक नसणाऱ्या भरपूर टेस्टस व गरज नसतानाही अँटीबायॉटीक्स पेशंटला लिहून देणाऱ्या डॉक्टर्सला गिफ्ट देण्यापासून ते सिंगापूर, मलेशियाचे टुर पॅकेज दिली जातात. त्याचप्रमाणे भारत, चीन, बंगलादेशातील लोकांना स्वस्त मजुर म्हणून पिळून त्यांच्या कडून कवडीमोल भावाने बनविलेल्या वस्तु बाजारात विकण्यावर अँपल पासून ते नाईकी, आदिदासचे नफे अवलंबून आहेत. तर देशाचीच साधनसंपत्ती असणाऱ्या पेट्रोलियम, नैसर्गिक वायूची लुबाडणूक करुन वर देशातीलच जनतेला ती आंतरराष्ट्रीय भावाने विकण्यावर रिलायन्सचे नफे!
अर्थातच, या विषमतेविरुद्ध जगभर असंतोष पसरला आहे. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात आज काय परिस्थिती आहे? तथाकथित आर्थिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या या देशातील जनता फूड कूपन्सवर जगते, हे ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रीट’ च्या आंदोलनामुळे जगासमोर आले. ‘आम्ही ९९% आहोत आणि देशाची आर्थिक संपत्ती केवळ १% भांडवलदारांच्या हाती एकवटलेली आहे’, असे म्हणत तेथील जनतेने भांडवलशाही व्यवस्थेविरुद्धचा आपला असंतोष व्यक्त केला. मग ही अशी विषमतापुर्ण समाजव्यवस्था टिकवायची तर मग आपल्या सत्तेला पुरक अशी विचारसरणी लादून सर्वसामान्य कष्टकरी वर्गावर आपले प्रभुत्व लादणे आवश्यकच ठरते. आणि मग त्यासाठी या वर्गाने जाणीवपुर्वक रुजविलेली विचारसरणी म्हणजे ’मनुष्य स्वार्थी आहे व तो त्याचा नैसर्गिक गुणच आहे’. या व्यवस्थेचे लाभधारक असणारे अनेक तथाकथित विचारवंत, वृत्तपत्रातील संपादकही याचीच तळी उचलत अखंडपणे स्वार्थाचं उदात्तीकरण करण्यात गुंतलेले असतात. मग त्यासाठी ही तथाकथित तज्ञांची फौज कधी डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा विपर्यास करुन तर कधी बौद्धिकतेचा आव आणत स्वार्थाचे सुप्त वा उघड समर्थन करते. खरोखरच आपण स्वार्थी आहोत का? जिथे समाजातील सारी साधन संपत्ती, कारखाने, बॅंका एवढेच नव्हे तर हॉस्पिटल्स, इंटरनॅशनल स्कुल्स, कॉलेजसही भांडावलदार वर्गाच्या हाती आहेत तिथे सर्वसामान्य माणूस काय स्वार्थ करतो व त्यातून त्याला काय हाती लागते? कुठे रिक्षावाले मीटरपेक्षा ५-१० रुपये भाडे जास्त काढायचा प्रयत्न करतात तर कुठे कोणी वीजेचे बील कमी करण्यासाठी मीटर वर लोहचुंबक ठेवत तर कुणी खोट्या पावत्या देऊन पगारातील थोडाफार कर वाचवायचा प्रयत्न करते. पण याला स्वार्थ म्हणायचा की रोजचे जगणं महाग होत असताना जगण्यासाठी केली जाणारी केविलवाणी धडपड? या धनदांडग्या वर्गाने आपण सारेच स्वार्थी आहोत असे म्हणणे आणि आपण त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे करकोचाने कोल्ह्यावर विश्वास ठेवण्यासारखे होईल. सपाट ताटात खीर ओतून कोल्हा करकोचाला म्हणतो ’खा मित्रा खा, खुशाल खीर खा.’ त्याचप्रमाणे ज्यांच्या हाती सारी सत्ता एकवटली आहेत ते आपल्याला सांगतात “आपण सारेच स्वार्थी आहोत व तुमचा आणि आमचा स्वार्थ एकच आहे!”
खरं विचार करायचा तर आपण स्वार्थी नाही आहोत आणि एक प्रकारे हाच प्रॉब्लेम आहे. आपला खरा स्वार्थ हा या स्वार्थावर आधारीत भांडवली व्यवस्थेत शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहण्यासाठी धडपड करण्यापेक्षा या व्यवस्थेला आव्हान देत परस्पर सहकार्यावर आधारीत नवी समाजवादी व्यवस्था निर्माण करण्यात आहे. किंबहुना डार्विनचाच आधार घ्यायचा तर मानवी प्रजातीच्या भवितव्यासाठीही हे अपरिहार्य आहे. उत्क्रांतीच्या नियमानुसार अन्न, संरक्षण व पुनरुत्पादन मुलभुत गरजा भागविण्याची प्रत्येक प्रजातीची स्वत:ची अशी एक विशिष्ट जीवनपद्धती निसर्गाच्या कक्षेत विकसित झाली आहे. साप एकटा स्वत:च्या वीषाच्या सहाय्याने भक्ष पकडून जगतो तर कोळी जाळे विणून. याऊलट मधमाशा, मुंग्या यासारखे प्राणी मात्र सामुहिकरीत्या अन्न गोळा करुन व एकत्रितपणे आपले संरक्षण करुन जगतात. मानवाच्या बाबतीत काय म्हणता येईल? मनुष्य हाही एक सामाजिक प्राणी आहे. आदिम कालखंडात एकत्र येऊन परस्परांच्या सहकार्याने प्रजाती म्हणून एकत्रितपणे टोळीत राहून त्याने आपले अन्न मिळविले, संरक्षण केले. ही सामुहिकता व परस्पर सहकार्य हाच मानवी प्रजातीच्या अस्तित्वाचा पाया आहे. ते सोडून आपला उघडा नागडा स्वार्थ जपणारी ही व्यवस्था अर्थातच भवितव्यासाठी मारकच असणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नाने याची एक झलक आज दिसतेच. तर आपल्याच नाही तर एकुणच मानवी प्रजातीच्या भवितव्यासाठी या व्यवस्थेला आव्हान देणे अपरिहार्य ठरते.

-अनिता

या पत्राविषयीची आपली प्रतिक्रिया कळवा
newsocialist.pune@gmail.com