वेळ आली आहे पंचनामा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची. ‘देश महासत्ता होत आहे’ असा जोरदार प्रचार आपले राज्यकर्ते करत आहेत. कधी कोणी ‘इंडिया शायनिंग’च्या बाता मारतं तर कोणी ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’ची डायलॉगबाजी. पण प्रत्यक्षात डोळे उघडून अवतीभवती पाहिलं तर काय दिसतं? डिग्र्यांच्या सुरळ्या हातात घेऊन सेट, नेटसह एमपीएससी, यूपीएससीच्या वाऱ्या करणारे करोडो बेरोजगार तरुण; शिक्षण, आरोग्याच्या वाढत्या खर्चाने हतबल झालेली जनता; रोजगाराच्या आशेने रोज शहरात येऊन धडकणारे तरुणांचे लोंढे व सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हताश डोळ्यांनी कोरड्या जमिनीकडे बघत दिवस काढणारे त्यांचे गावाकडील आई–वडील! विकासाच्या नावाखाली एकीकडे टोलेजंग टॉवर्स, चकाचक प्रकल्प उभे राहत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कुपोषणाने मृत्युमुखी पडणारी बालके यांचे सत्रही अथकपणे सुरु आहे. कसा लावायचा या साऱ्याचा मेळ? गरज आहे चिकित्सा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची! विकास म्हणजे काय? विकासाच्या नावाखाली राबवली जाणारी धोरणं खरंचंच देशाचा विकास करणारी आहेत का? तसं नसेल तर मग याला पर्याय काय? काय आहे पर्यायी विकासाची संकल्पना? read more